खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री १ वाजता एका मित्राच्या घरी भेटीस आलेल्या दोन तरुणांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी सुरू केली.
कोल्हे नगरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भाड्याने राहणारे राजदीप राजू सपकाळे (वय ४०) यांच्या घरी बुधवारी रात्री दीपक तरडे आणि ललित कोळी हे दोघेजण आले होते. जेवणाच्या वेळेत दीपक तरडे याने जवळ असलेला गावठी कट्टा दाखवत असताना अचानक गोळीबार केला. गोळी कोणालाही लागली नाही, मात्र घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर दीपक तरडे आणि ललित कोळी तेथून निघून गेले.
घटनेनंतर सपकाळे कुटुंबीयांनी भीतीपोटी कुणालाही याची माहिती दिली नव्हती. गुरुवारी दुपारी उशिरा ही बाब उघडकीस आली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या खोलीची पाहणी केली जिथे गोळीबार झाला होता आणि तेथून रिकाम्या पुंगळ्याचा (गोळीच्या रिकाम्या साड्यांचा) ताबा घेतला.
राजदीप सपकाळे हे तीन महिन्यांपासून या घरात भाड्याने राहत होते. मात्र, घरमालक देवेंद्र भिमराव शेळके (रा. कोल्हे नगर) यांनी या भाडेकरूंची माहिती महापालिका किंवा पोलीस ठाण्यात नोंदवलेली नव्हती. याबाबत कायद्याने माहिती देणे बंधनकारक असूनही ती न दिल्यामुळे घरमालकाविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील एक संशयित रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची चौकशी सुरू आहे. दुसरा संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. गोळीबाराच्या घटनेची माहिती रात्री कुणालाही न दिल्यामुळे ती गुरुवारी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आदींच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.
Tags
जळगाव