खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - पाचोरा येथे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्याला सोलर प्लेट फिटिंग कामांसाठी मंजुरी देण्याच्या मोबदल्यात तब्बल २९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, त्यांनी ३२ वर्षीय तक्रारदाराकडून एकूण ७९,००० रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे. तक्रारदाराचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून, तीन नवीन प्रकरणांच्या ‘रिलीज ऑर्डर’साठी प्रत्येकी ३,००० रुपये (एकूण ९,००० रुपये) आणि पूर्वी मंजूर केलेल्या २८ प्रकरणांसाठी प्रत्येकी २,५०० रुपये (एकूण ७०,००० रुपये) अशी मागणी करण्यात आली होती.
तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर, पथकाने सापळा रचून १२ ऑगस्ट रोजी मोरे यांच्या कार्यालयात कारवाई केली. त्यावेळी मोरे यांनी तक्रारदाराकडून सध्याच्या तीन प्रकरणांसाठी ९,००० रुपये आणि पूर्वीच्या प्रकरणांच्या लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २०,००० रुपये — असे एकूण २९,००० रुपये स्वीकारले.
लाच स्वीकारत असतानाच एसीबीने त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आणि चालक सुरेश पाटील यांनी सहभाग घेतला.
Tags
जळगाव