भुसावळमध्ये मध्यरात्री पोलिसांची धडक; तस्कराच्या हातून १० किलो गांजा जप्त

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जिल्ह्यात दिवसेंदिवस अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेता जिल्हा पोलिसांनी या विरोधात कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पहाटे भुसावळमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत मध्यप्रदेशातून आलेला एक गांजाची तस्करी करणारा इसम रंगेहात पकडण्यात आला असून त्याच्याकडून तब्बल १० किलोहून अधिक गांजा तसेच वाहन व मोबाईलसह एकूण २.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुरुवारी पहाटे सुमारे १.५५ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाळ गव्हाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवर गांजा वाहून भुसावळ शहरात येत आहे. तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली. त्यांच्या आदेशावरून पो.उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आणि कारवाईसाठी भुसावळकडे रवाना करण्यात आले.

सदर पथकाने भुसावळमधील हॉटेल सुरुची इनसमोरील नॅशनल हायवेवरील नागपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा लावला. थोड्याच वेळात संशयास्पद काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे सांगितले.

तपासात आरोपीकडून सुमारे १०.२७५ किलो गांजा (किंमत ₹२,०५,५००), एक शाईन मोटारसायकल (₹७५,०००) आणि मोबाईल (₹१०,०००) असा एकूण ₹२,९०,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट १९८५ चे कलम २०(ब), २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहा. पो.नि. नितीन पाटील यांच्या समन्वयाने स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.

या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून पोलिसांनी अशा प्रकारच्या टोळ्यांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांनीही या संदर्भात सहकार्य करून पोलिसांना गोपनीय माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post