जळगावात ‘स्वदेशीचा स्वीकार – विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 🚩

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यामार्फत ८ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनानिमित्त आज जळगाव येथे ‘स्वदेशीचा स्विकार - विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ आज आमदार राजूमामा भोळे व स्वदेशी जागरण मंचचे देवगिरी प्रांत सहसंयोजक डॉ.युवराज परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. 

शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर या मोहिमेच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली.

भाजपाचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी नागरिकांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना म्हटले की, विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकत स्वदेशी वस्तू खरेदी केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरु चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे. येत्या काही दिवसात ती दुसऱ्या स्थानी पोहचेल. यात प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के कर लावला आहे. याला प्रतिउत्तर विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून आपण देवू शकतो, असे सांगत त्यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.

स्वदेशी जागरण मंचच्या देवगिरी प्रांत सहसंयोजक डॉ. युवराज परदेशी यांनी नागरिकांनी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांकडून वस्तू खरेदी करण्यापेक्षा स्थानिक व्यापारी व विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले. स्वदेशी जागरण मंच नेहमीच असा विश्वास ठेवतो की कोणत्याही देशाचा विकास परकीय संसाधनांनी, आयातीने किंवा परदेशी तंत्रज्ञानाने होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे यांनी उद्योजक आत्मनिर्भर भारतासाठी जळगाव जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजक कसे योगदान देत आहे, याची माहिती दिली. येत्या महिनाभारत स्वदेशी जागरणमंचतर्फे जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बाजार जायेंगे स्वदेशीही खरेदींगे, स्वदेशी अपणाओ- देश बचाओ या घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी स्वदेशी जागरणमंचचे संपर्क प्रमुख अजिंक्य तोतला, शहर संयोजक चेतन वाणी, युवा प्रमुख कल्पेश सोनवणे, भाजपाचे जिल्हाप्रमुख दीपक सुर्यवंशी, विशाल त्रिपाठी, अमोल वाघ, जयेश भावसार, सुनिल सरोदे, नितीन इंगळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
स्वदेशी जागरण मंचतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. विदेशी वस्तूंना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वरिष्ठ शाळा आणि विद्यार्थी सहकार्याने जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post