जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत पुन्हा खळबळजनक बदल, राहुल गायकवाड नवा चेहरा

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा (L.C.B.) निरीक्षक पद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची तातडीने बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक हे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनंतर कायदा व सुव्यवस्था हाताळणारे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. त्यामुळे या पदावर होत असलेल्या बदलांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते.

गेल्या काही वर्षांत या पदावर सतत बदल होताना दिसले आहेत. ३१ मे २०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी बबन आव्हाड यांची नियुक्ती झाली होती. परंतु, ड्रग्स प्रकरण विधानसभा अधिवेशनात गाजल्याने आव्हाड यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर संदीप पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षकपदी बसविण्यात आले होते.

मात्र, आज (२९ ऑगस्ट) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार आ. मंगेश चव्हाण यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी एका महिलेकडून निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचे आरोप करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

या घडामोडीनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाई करत पाटील यांची बदली केली आणि त्यांना नियंत्रण कक्षात पाठवले. त्याचवेळी, राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी करण्यात आली.

या बदलामुळे जिल्ह्यातील पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा तपास व घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post