खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढीस लागली असताना चाळीसगावात घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञातांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री वैष्णवी साडी सेंटरजवळ अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांना एकटं गाठून कोयत्याने वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्याकडे हलविण्यात आले. चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाला की इतर कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
Tags
जळगाव