खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेत होत असलेल्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी धक्कादायक घटना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आली आहे. स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अचानक पाहणीत रुग्णालयातील सुरक्षारक्षकच मद्यधुंद अवस्थेत कर्तव्य बजावत असल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पाटील रुग्णालयाच्या परिसरात फिरत असताना एका सुरक्षारक्षकाची हालचाल संशयास्पद वाटली. संवाद साधताच त्याच्या बोलण्यातील अडखळणे आणि वागण्यातून तो नशेत असल्याचे लक्षात आले. चौकशीदरम्यान संबंधित रक्षकाने दारू सेवन केल्याची कबुलीही दिली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीनेच अशा बेफिकिरीने वागणे, हा गंभीर प्रकार असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. आमदार पाटील यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाला कठोर शब्दांत सुनावले. “अशा प्रकारांना मोकळे रान का मिळते आणि व्यवस्थापन झोपले आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, संबंधित सुरक्षारक्षकावर व त्याला नेमणूक करणाऱ्या कंत्राटदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षारक्षक जर मद्यप्राशन करून ड्युटीवर असेल, तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असेल, याबाबतही आता चर्चा रंगू लागली आहे.
घटनेवर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी व्हिडीओ व्हायरल झाल्याने लवकरच कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
Tags
जळगाव