खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या प्राणघातक कोयता हल्ल्यानंतर पोलिसांनी अल्पावधीतच मोठी कामगिरी बजावली आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार सोमा उर्फ सागर चौधरी याच्यासह हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी या तिघांना पोलिसांनी शनिवारी उशिरा सापळा रचून अटक केली. या अटकेमुळे चौधरी हल्ला प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे.
शहरातून काढली आरोपींची जाहीर धिंड
दिवसा-दिवसा नगरसेवकावर हल्ला करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या तिघांना पोलिसांनी नागरिकांसमोर उभे केले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चाळीसगाव शहरातून पायी धिंड काढली. मोठ्या संख्येने नागरिक या कारवाईसाठी उपस्थित राहिले. नागरिकांसमोर उघडपणे आरोपींना फिरवून पोलिसांनी त्यांचा धाक मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयाने दिली सात दिवसांची पोलीस कोठडी
धिंड काढल्यानंतर तिन्ही आरोपींना दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात हल्ल्यामागील कारणे, इतरांचा सहभाग आणि वापरलेली शस्त्रे याबाबत सखोल तपास केला जाणार आहे.
या धडक कारवाईमुळे शहरात दिलासा निर्माण झाला असून, कायद्याचा धाक पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मनात बसल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
Tags
जळगाव