खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील पांडे चौक परिसरातील स्व. नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान संचलित दीक्षित वाडी मित्र मंडळाचा “जळगावचा विघ्नहर्ता” यंदा जळगावकरांच्या भेटीस येत आहे. तब्बल २५ फूट उंचीची ही भव्य मूर्ती बर्हाणपूर येथून २४ तासांचा प्रदीर्घ प्रवास करून जळगावात दाखल झाली असून, सुप्रसिद्ध मूर्तिकार अतुल वैद्य यांनी या मूर्तीची निर्मिती केली आहे.
मंडळाचा ५५ वर्षांचा प्रवास
दीक्षित वाडी मित्र मंडळ हे जळगावातील मोजक्या जुन्या मंडळांपैकी एक असून यंदा मंडळाच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याची परंपरा असलेल्या या मंडळाने प्रत्येक वर्षी जनजागृतीपर देखावे, सामाजिक उपक्रम, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आगमन सोहळ्याची जळगावकरांना उत्सुकता
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळाच्या आगमन सोहळ्याची जळगावकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यंदा देखील मंडळाने सुप्रसिद्ध स्वरगंगा बँडच्या तालावर आगमन सोहळा रंगणार असून संपूर्ण शहराचे लक्ष या सोहळ्याकडे लागलेले आहे.
सोशल मीडियावर मंडळाची धमक
डिजिटल युगातही मंडळ मागे नाही. ‘जळगावचा विघ्नहर्ता’ या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून विविध आकर्षक रील्स प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही या मंडळाने आपली स्वतंत्र छाप निर्माण केली आहे.
आगमन सोहळ्याचे आयोजन
भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून २५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (कोर्ट चौक) येथून पांडे चौकापर्यंत मूर्तीचे आगमन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे जळगावकरांना करण्यात आले आहे.
Tags
जळगाव