उघडी विद्युत डीपी बनली जिवघेणी! नागरिकांच्या सुरक्षेला धोका, 🧯 महावितरणचे दुर्लक्ष कायम! तक्रारी करूनही नाही सुधारणा

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील मोहाडी रस्त्यावरील जकात नाक्याजवळ असलेली विद्युत वितरण पेटी (डीपी) नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. ही डीपी पूर्णपणे उघडी असून, पावसाचे पाणी थेट आत शिरत असल्यामुळे ती अत्यंत धोकादायक बनली आहे.

पावसामुळे डीपीतील फ्यूज आणि तारांवर कार्बन जमा होत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. परिणामी, परिसरातील नागरिकांना कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा सहन करावा लागत असून, याचा फटका घरगुती उपकरणांवर पडत आहे. अनेक नागरिकांचे इन्व्हर्टर, फ्रीज आणि बॅटऱ्या यामुळे खराब झाल्याच्या तक्रारी आहेत. दर महिन्याला एक ते दोन वेळा असा प्रकार घडत असून, स्थानिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

महावितरणचे दुर्लक्ष कायम
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अपघाताचा गंभीर धोका
ही उघडी विद्युत डीपी केवळ वीजपुरवठा विस्कळीत करत नाही, तर मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे. पावसाळ्यात यामार्फत कोणतीही दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

तातडीने उपाययोजनांची मागणी
नागरिकांनी महावितरणकडून या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित डीपीला सुरक्षीत झाकण बसवण्याची आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते, असा इशारा काही स्थानिकांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post