खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - सामाजिक वनीकरण विभागातील तीन कर्मचाऱ्यांना बांबू लागवडीसाठी मंजुरी देण्यासाठी लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) जळगावने पारोळा येथे कारवाई करत ही धडक कार्यवाही केली. एकूण ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित अधिकारी व कर्मचारी रंगेहाथ सापडले.
या प्रकरणी अटकेत आलेले कर्मचारी म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे (वय ५४), लिपिक निलेश मोतीलाल चांदणे (वय ४५) आणि कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील (वय २७) यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील ३० वर्षीय शेतकऱ्याने आपल्या आणि तीन नातेवाईकांच्या शेतात अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी विभागाकडे अर्ज केला होता. मंजुरीसाठी कापुरे यांनी प्रत्येक फाईलसाठी १० हजार रुपये अशी एकूण ४० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम ३६ हजारांवर आली.
तक्रारदार शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दाखल करताच पथकाने पडताळणी केली. त्यात लाच मागणीचे सत्य आढळून आले. ठरल्याप्रमाणे, कैलास पाटील यांनी पंचासमक्ष ३६ हजार रुपये स्वीकारले आणि त्यानंतर एसीबीने तिन्ही आरोपींना रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags
जळगाव