खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - हद्दपारीचा आदेश धाब्यावर बसवून शहरात वास्तव्यास असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिपेठ पोलिसांनी बुधवारी (२० ऑगस्ट) दुपारी कारवाई करत अटक केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांना त्यांच्या घरातूनच ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस दिलीप सोनवणे यास उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून, तर सागर उर्फ बीडी सुरेश सपकाळे यास पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ठरावीक कालावधीसाठी जिल्हाबंदीचा आदेश देण्यात आला होता. तरीही दोघेही आरोपी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता जळगाव शहरातील राहत्या घरी वास्तव्य करत असल्याचे गुप्त माहितीवरून समोर आले.
२० ऑगस्ट रोजी संध्याकाळी पेट्रोलिंगदरम्यान ही माहिती पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर तातडीने पथक तयार करण्यात आले. गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी आणि काजोल सोनवणे या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह निरीक्षक कमलाकर यांनी आरोपींच्या घरावर छापा टाकला. त्या वेळी दोन्ही आरोपी घरातच आढळून आले.
त्यांना तातडीने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस यंत्रणेची सतर्कता अधोरेखित झाली असून, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची करडी नजर असल्याचा ठोस संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
Tags
जळगाव