पुतळा विटंबना प्रकरणात गावात तणाव; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात पहाटेच्या सुमारास एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे.

भर पावसात संतप्त नागरिकांची ठाण्यासमोर गर्दी
घटनेची बातमी पसरताच गावकऱ्यांमध्ये संताप उसळला. भर पावसातही शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर जमून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. “ही केवळ पुतळ्याची नव्हे, तर आमच्या श्रद्धेची विटंबना आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी,” असे नागरिकांनी ठामपणे सांगितले. पोलिसांनी तातडीने पुतळ्याची डागडुजी करण्याचे तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, कल्याणी वर्मा आदी अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

पोलिसांचे आवाहन — शांतता राखा, अफवा टाळा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन संशयिताची चौकशी सुरू केली आहे. “ही अतिशय दुर्दैवी घटना असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी आणि सोशल मीडियावर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितले. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

गावात परिस्थिती नियंत्रणात
शेंदुर्णी हे जामनेर तालुक्यातील एक प्रमुख गाव असून, अशा घटना येथे दुर्मीळ आहेत. जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post