📌 चाळीसगावमध्ये जिल्हा परिषद अधिकारी आणि नागरिक आमने-सामने; तक्रारींवर थेट सुनावणी

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - 
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत गुरुवार, दि. 7 ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीत तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. मंगेश चव्हाण व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे व चंद्रकांत जगताप, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, अभियंता अमोल पाटील, सुनील जाधव, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या तक्रार निवारण सभेत नागरिकांकडून 100 पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून, मुख्य कार्यकारी अधिकारी व आमदार यांच्या समोर प्रत्यक्ष सुनावणीद्वारे तक्रारी ऐकून घेतल्या गेल्या. प्रत्येक तक्रारीवर सखोल चर्चा करण्यात येऊन संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

“जिल्हा परिषद आपल्या दारी” या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न थेट प्रशासकीय पातळीवर मांडण्यास व तातडीने निवारण करण्यास मदत होत आहे. नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढविण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post