खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील रामेश्वर कॉलनीतील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी (१८ ऑगस्ट) पहाटे पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पहाटे तीन वाजता हल्लेखोरांचा रक्तरंजित खेळ
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास विशाल मोचीवर अचानक हल्ला करण्यात आला. तीक्ष्ण हत्यारांनी केलेल्या वारांमुळे तो जागीच कोसळला. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पोलिस तपास सुरू, कारण अद्याप अस्पष्ट
रामेश्वर कॉलनीत राहणारा विशाल सोलर पॅनेलच्या बेस बसविण्याचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Tags
जळगाव