महाबळ परिसरातील न्यू स्टेट बँक कॉलनीत देहविक्री व्यवसाय उघडकीस; दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील महाबळ कॉलनी परिसरातील न्यू स्टेट बँक कॉलनी येथे रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने रविवारी (दि. १० ऑगस्ट) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास धाड टाकून देहविक्री व्यवसाय चालवणाऱ्या दांपत्याला अटक केली. यावेळी पश्चिम बंगाल येथील २३ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली.

रामानंदनगर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथक तयार करून डमी ग्राहक घटनास्थळी पाठविण्यात आला. ग्राहकाकडून मिळालेल्या संकेतावर पोलिसांनी दोन मजली घरावर धाड टाकली. तपासात खालील मजल्यावर संशयित दिनेश संजय चौधरी (३५, रा. दुध फेडरेशन रोड) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती उर्फ भारती दिनेश चौधरी (४२, रा. देवेंद्र नगर, सध्या न्यू स्टेट बँक कॉलनी) बसलेले आढळले. वरच्या मजल्यावरील बंद खोलीत डमी ग्राहकासह ती तरुणी आढळली.

तिघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर दांपत्याविरोधात कुंटणखाना चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना घूनावत यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.

ही कारवाई निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन रणशेवरे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post