खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - मुक्ताईनगर तालुक्यात आणखी एक खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील लालगोटा येथे मंदिरात देवीची मूर्ती ठेवण्याच्या जुन्या वादातून एका प्रौढाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, लालगोटा येथील मीनाक्षी राणा पवार यांनी फिर्याद दिली की, गावातील मंदिरात देवीची मूर्ती स्थापनेसंदर्भात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. याच कारणावरून १७ ऑगस्ट रोजी रात्री आरोपी गुरुदीप निलेश बाबू पवार, राजेंद्र बाबू उर्फ सिगरेट बाबू पवार, क्रिश राजेंद्र बाबू पवार, दीपक जिलेश बाबू पवार, जिलेश बाबू कोनाली पवार, शक्ती कपूर सिगरेट बाबू पवार, शिव कपूर शक्ती कपूर पवार, लताबाई शक्ती कपूर पवार आणि अनुलेखा दीपक पवार यांनी राणा मनमौजदार पवार (वय ४५) याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.
या हल्ल्यात राणा पवार गंभीर जखमी झाला असून, तो जागेवरच बेशुद्ध पडला. तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हल्ल्यात मीनाक्षी राणा पवार, राजकुवर राणा पवार, धनकुवर राणा पवार, सर्जेस पवार, सरजू पवार आणि चोनीबाई पवार हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ आणि फॉरेन्सिक पथकाने भेट दिली. पुढील तपास पोनि आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Tags
जळगाव