दीपक तरुण मंडळाच्यावतीने कार्यकारिणी जाहीर
खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - रथ चौक येथील दीपक तरुण मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात अष्टभुजा स्वरूपातील श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडळाच्या ५३ व्या वर्षाचे औचित्य साधून बुरहानपूर येथून सहा फूट उंचीची ही भव्य मूर्ती आणली जाणार असून, मंडळ परिसरात उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे.
मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक भान निर्माण करणारी आरास उभारली जाते. यंदाही मंडळाकडून सामाजिक विषयावर भव्य आरास साकारली जाणार असून याबाबत मंडळात तयारी सुरू आहे. यापूर्वी मंडळाने धार्मिक तसेच सामाजिक जाणीव जागृती करणाऱ्या विविध संकल्पनांवर आधारित आरास साकारल्या आहेत. तसेच, विसर्जन मिरवणुकीत मंडळातील युवकांकडून नेहमीच आकर्षक कसरतीचे सादरीकरण केले जाते.
गणेशोत्सवापुरतेच नव्हे तर वर्षभर धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविणारे हे मंडळ शहरात वेगळेपणाने ओळखले जाते. गावगुढी पूजन, वाहन पानसुपारीसह विविध धार्मिक कार्यक्रम मंडळातर्फे वर्षभर राबवले जातात. मंडळाच्या कार्यालयात दररोज सकाळी अंगणवाडी वर्गही भरवले जात असल्याने मंडळ सामाजिक बांधिलकीही जपत आहे.
गणेशोत्सव २०२५ साठी नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी मनीष वाणी, उपाध्यक्षपदी पंकज शर्मा, खजिनदारपदी महेश भालेराव व सचिवपदी योगेश कासार यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सदस्य म्हणून प्रमोद तांबट, ओंकार तांबट, दीपक ठाकूर, दीपक तांबट, मनोज सपकाळे, सागर शिंपी, कवी कासार, किरण शिंपी, प्रणव तांबट, कपिल कासार, तरुण शर्मा व कवी सपकाळे यांचा समावेश आहे. तर सल्लागार मंडळात बालूमामा कासार, संजय जोशी, उमेश कासार, मुन्ना तांबट, सतीश वाणी, संजय वाणी, चंद्रकांत तांबट, संतोष तांबट व योगेश बोबडे यांची निवड झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रथ चौक परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, दीपक तरुण मंडळाची यंदाची आरास व अष्टभुजा स्वरूपातील मूर्ती नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
Tags
जळगाव