नियम नागरिकांसाठी कठोर, कार्यकर्त्यांसाठी सवलती? – बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणाने मनपा चर्चेत

आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्यकर्त्यांचे जळगावात बेकायदेशीर होर्डिंग्ज 

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील आकाशवाणी चौक पुन्हा एकदा बेकायदेशीर होर्डिंग्जमुळे चर्चेत आला आहे. नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावलेला अवाढव्य बॅनर जळगाव महापालिकेने हटवून संबंधित कार्यकर्त्यावर नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु काही दिवसांतच त्याच चौकात पुन्हा एक नवीन राजकीय होर्डिंग उभे राहिले आहे. यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा बॅनर लावला आहे.

विशेष म्हणजे, हे दोन्ही बॅनर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता लावण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील गजबजलेल्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी अशी प्रचंड बॅनरफ्लेक्स उभारणे हे थेट सार्वजनिक सुरक्षेला धोका पोचवणारे आहे.

मनपाची कारवाई कागदावरच?
गेल्या आठवड्यात मनपाने आर्थिक दंड आकारून प्रकरण थंड केले होते. मात्र त्याच ठिकाणी, त्याच फ्रेममध्ये फक्त बॅनर बदलून पुन्हा होर्डिंग लावले गेले आहे. त्यामुळे मनपाची कारवाई ही केवळ दिखाऊ आणि कागदापुरती असल्याची टीका होत आहे.

सामान्यांवर कठोर, कार्यकर्त्यांवर मवाळ?
शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, सामान्य नागरिकांनी किंवा संघटनांनी बॅनर लावल्यास मनपा तातडीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करते. मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच जेव्हा नियम मोडले जातात, तेव्हा कारवाई दंडापुरतीच मर्यादित राहते. यामुळे “मनपा सर्वांसाठी समान नियम का पाळत नाही?” असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.

मनपाची भूमिका
मनपाच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्याने लावण्यात आलेल्या या होर्डिंगला देखील कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post