लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करणार?
खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जिल्ह्यातील खिळखिळी झालेली संघटनात्मक रचना पुन्हा उभारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असताना, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी पक्षाची साथ सोडत सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) आपला राजीनामा थेट प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.
राजीनाम्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांनी आपल्या निर्णयाबाबत अद्याप जाहीर वक्तव्य केले नसले, तरी त्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
या संदर्भात ‘लोकमत’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, शिंदे यांनी प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे, आदिवासी व वंचित घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिभा शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राजकीय जाणकारांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील समीकरणे वेगाने बदलत असून, शिंदे यांचा पक्षत्याग हा काँग्रेससाठी केवळ संघटनात्मकच नव्हे तर प्रतिमात्मकदृष्ट्याही मोठा धक्का आहे. त्यांच्या जाण्याने आदिवासी व ग्रामीण भागातील काँग्रेसच्या मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags
जळगाव