खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलेल्यांमध्ये आयुष मणियार व पीयूष मणियार या दोघा भावंडांचा शस्त्र परवाना रद्द करण्याविषयीचा प्रस्ताव पोलिस दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी “या दोघा भावांना शस्त्र परवान्याची नेमकी गरज काय?” असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही कारवाई वेगाने सुरू करण्यात आली.
या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने सविस्तर अहवाल मागविण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने पुढील कार्यवाही करत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय झाल्यानंतर दोघा भावंडांचा शस्त्र परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “आयुष मणियार व पीयूष मणियार यांच्यावर गंभीर आरोप झाले असून, त्याबाबत चौकशीसाठी त्यांना लवकरच बोलावण्यात येणार आहे. चौकशीअंती पुढील निर्णय घेतला जाईल.” सध्या जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, मणियार बंधूंना दिलेल्या शस्त्र परवान्याबाबत नागरिकांमध्येही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
Tags
जळगाव