कौटुंबिक वाद उफाळला; बिलवाडीतील चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - बिलवाडी गावात रविवारी दुपारी भीषण हाणामारीची घटना घडली. जुन्या वैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुफानी मारामारीत एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दशकभरापासून जुना वाद सुरू आहे. शनिवारी रात्री दुचाकी अडवल्याच्या किरकोळ कारणावरून दोन्ही गटांत शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी समजूत काढली होती. मात्र, राग शांत न झाल्याने दुसऱ्याच दिवशी हा वाद रक्तरंजित स्वरूपात उफाळून आला.

रविवारी दुपारी गोपाळ कुटुंबातील काही जण ग्रामपंचायतीच्या बांधकामावर कामासाठी गेले होते. त्याच ठिकाणी पाटील कुटुंबातील सदस्य आले आणि पुन्हा वाद रंगला. थोड्याच वेळात हा वाद हातघाईत बदलला. पावडी, लाकडी दांडे आणि बांधकामातील साहित्याचा वापर करून झालेल्या मारामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला.

या चकमकीत किरण देविदास पाटील (२८), मिराबाई सुभाष पाटील (४५), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (४०), दीपक ज्ञानेश्वर पाटील (२३), संगीता रोहिदास पाटील (४०), जनाबाई एकनाथ गोपाळ (५५), एकनाथ बिलाल गोपाळ (३५), गणेश एकनाथ गोपाळ (२३), भीमराव एकनाथ गोपाळ आणि कमलेश प्रमोद पाटील (२६) असे एकूण ११ जण जखमी झाले आहेत.

घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला आहे. कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post