👥 १,४३६ स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग; ११ ठिकाणी अखंड संकलन
खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - अनंत चतुर्दशीनिमित्त जळगाव शहरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन अभियानाचा आज उत्साहात शुभारंभ झाला. गणेश विसर्जनानंतर निर्माण होणारे हार, फुले, माळा व पूजासाहित्य पर्यावरणाला अपाय न करता पुनर्वापर करता यावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेत झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजू मामा भोळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या अभियानात एकूण १,४३६ स्वयंसेवकांचा सहभाग असून १,४१२ श्रीसदस्यांनी काम पाहिले. शहरात ११ प्रमुख ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आली असून सकाळी १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत अखंड संकलन चालले. शिवाजी उद्यान ग्राउंड येथे निर्माल्य प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. अंदाजे १०० ते ११० टन निर्माल्य जमा होण्याचा अंदाज असून त्यापासून पर्यावरणपूरक खतनिर्मिती प्रक्रिया केली जाणार आहे.
जळगाव शहरातून ५५.९५ टन निर्माल्य संकलन झाले. सावखेडा प्रिंप्राळा येथून ८.५० टन तर मन्यारखेडा येथून १०.५० टन निर्माल्य जमा झाले. एकूण २२ वाहने संकलित साहित्य प्रक्रिया केंद्रात आणण्यात आली. या उपक्रमामुळे धर्म, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश शहरात पोहोचला असून समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. जळगावात पर्यावरण संवर्धनासाठी हे अभियान आदर्श ठरणार आहे.