करारनाम्याचा कालावधी शिल्लक असतानाही जागा खाली करण्याचा दबाव?

आत्महत्येनंतरही कारवाई नाही – जळगाव शहरात ‘त्या’ बापलेकांवर संताप

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील रिंगरोड परिसरातील हॉटेल रोनक येथे दि. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (वय ४८, रा. निवृत्ती नगर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास घडली असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुसाइड नोटवरून उघडले धक्कादायक आरोप
आत्महत्येपूर्वी आशिष फिरके यांनी एक सुसाइड नोट लिहून ती सोशल मीडियावर स्टेटस म्हणून टाकली होती. या चिठ्ठीत त्यांनी रोनक हॉटेल मागील तीन वर्षांपासून भाडेतत्त्वावर चालवत असल्याचे नमूद केले आहे. तीन वर्षांचा करारनामा असतानाही जागा मालकाने अचानक जागा खाली करण्यासाठी दबाव टाकल्याचा, तसेच जागा मालकाचा मुलगा वेळोवेळी धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप फिरके यांनी सुसाइड नोटमध्ये केला आहे. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे.

मित्रपरिवाराने पोलिसांना दिली माहिती
मध्यरात्री फिरके यांनी स्टेटस टाकल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने व नातेवाईकांनी ते पाहून तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ फिरके यांनी गळफास घेतल्याचे आढळले. त्यांना त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिस तपास मात्र गुन्हा अद्याप दाखल नाही
या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, १६ सप्टेंबर रोजी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणीही केली. मात्र घटनेला दोन दिवस उलटूनही हॉटेल मालक व त्यांचा मुलगा यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कुटुंबीयांकडून तक्रार मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शहरात चर्चेला उधाण
फिरके यांच्या सुसाइड नोटमध्ये स्पष्टपणे जागा मालक व त्याच्या मुलाकडून दबावाचा उल्लेख असूनही, अद्याप कोणतीही चौकशी अथवा कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘त्या’ बापलेकांची चौकशी होणार का, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, याबाबत सध्या शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post