जळगावात अपघाताची मालिका कायम; ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू



खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जिल्ह्यातील विविध ठिकाणी अपघातांच्या घटना घडत असतानाच आज शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) सकाळी जळगाव शहरात आणखी एक भीषण अपघात घडला. अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसरात सकाळी 11 वाजताच्या सुमारास सिमेंटने भरलेला ट्रॅक्टर चढावावर जात असताना ताबा सुटून पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक गणेश मोरसिंग चव्हाण (वय 47, रा. भैरवनगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) यांचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला.

घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण हे ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी रेल्वे मालधक्क्यावरून ट्रॅक्टर (क्र. एमपी-68 ए 0646) मध्ये सिमेंटच्या गोण्या भरल्या होत्या. सकाळी 11 वाजता ते अनुराग कॉलनीतील तीव्र चढावावरून जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला आणि चव्हाण हे ट्रॅक्टरखाली दबले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळीच त्यांनी प्राण सोडले.

पोलिसांची तत्काळ धाव

अपघाताची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कॉन्स्टेबल योगेश माळी, संदीप सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि झुलालसिंग परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून चव्हाण यांना बाहेर काढण्यात आले. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

नातेवाईकांचा आक्रोश, पुढील तपास सुरू

घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या आक्रोशामुळे वातावरण हळहळजनक झाले. या अपघाताची नोंद रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post