जळगावात प्रदूषण मंडळाचा अधिकारी लाच घेताना अटक, एसीबीची कारवाई

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जळगावातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकार्‍याला १५ हजार रुपयांची लाच मागून ती खाजगी पंटराद्वारे फोनपे अ‍ॅपवर स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईत आरोपी अधिकारी राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (४२, रा. नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) याला अटक करण्यात आली असून, खाजगी पंटर मनोज बापू गाजरे मात्र पसार झाला आहे. या धाडसी कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ही कारवाई जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे, शिपाई भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.

असे उघड झाले प्रकरण
रावेर येथील एका हॉस्पीटलमधील मॅनेजरने याबाबत तक्रार दाखल केली होती. हॉस्पीटलच्या बायोवेस्ट संदर्भातील प्रमाणपत्रासाठी १६ मार्च रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला जळगाव कार्यालयात झालेल्या त्रुटींनंतर नाशिक कार्यालयातून २८ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र मिळाले. मात्र, जळगाव कार्यालयातील अर्ज मागे घेण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी तक्रारदार गेले असता, सूर्यवंशीने १५ हजारांची लाच मागितली. त्याचप्रमाणे सदर आरोपीच्या कार्यालयात सापळा कारवाई दरम्यान त्याच्या हँडबॅग मध्ये 2,26,000/- रुपये रोख रक्कम देखील मिळून आली आहे.

लाच न देण्याचा निर्णय घेतलेल्या तक्रारदाराने २३ सप्टेंबर रोजी जळगाव एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. बुधवार, २४ सप्टेंबर रोजी खाजगी पंटर मनोज गाजरे याने फोनपे अ‍ॅपद्वारे रक्कम स्वीकारली. मात्र तो पसार झाला आणि अधिकारी सूर्यवंशीला अटक करण्यात आली.

कारवाईदरम्यान एसीबीने सूर्यवंशीच्या कार्यालयातील हँडबॅगमधून तब्बल २ लाख २६ हजार रुपयांची रक्कम जप्त केली. त्याचबरोबर नाशिक येथील त्याच्या घरावर झडती सुरू असून, तेथूनही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post