खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - पाचोरा आणि भडगाव तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णतः उध्वस्त झाल्याने शेतात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून पीक काढणी अशक्य झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) निकषांपेक्षा तीनपट अधिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
आमदार पाटील यांनी दोन्ही तालुक्यांचा दौरा करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. त्यांनी पत्रात नमूद केले की, अतिवृष्टीमुळे या भागातील खरीप हंगाम पूर्णतः संपुष्टात आला असून, पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील पाणी निचरला नसल्याने अजूनही शेतात पाणी साचले आहे. सलग दुसऱ्या वर्षी शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे.
पाचोरा तालुक्यातील पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)
१६ सप्टेंबर : ११४.८
२२ सप्टेंबर : १४७.८
२३ सप्टेंबर : १३९.३
२३ सप्टेंबरपर्यंत पाचोरा तालुक्यात सरासरी पावसापेक्षा तब्बल १८९ टक्के जास्त म्हणजे २५७.८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. तर भडगाव तालुक्यात सरासरी ९०.७० मिमीच्या तुलनेत तब्बल १७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केलेल्या पत्रातून शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याचे आवाहन केले असून, शेतकरी संकटातून सावरला नाही तर शेती अर्थव्यवस्था ढासळण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.
Tags
जळगाव