जळगावातील शास्त्री नगरात पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई – पिस्तुल, जिवंत काडतुसेसह पाच जण गजाआड

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांच्या गुप्त व सखोल तपासानंतर शास्त्री नगर परिसरातून गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करत १ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता शास्त्री नगर भागात संशयित तरुणांची हालचाल आढळून आली. यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी सलीम रमेश पटेल (३८), मुथा रामचंद्र पाटील (४३), युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (३३), सोहेल शेख वसीम शेख (२९) व शाहीन नगरातील आणखी एक तरुण (२९) यांना ताब्यात घेतले.

तपासात समोर आले की, ही टोळी गेल्या काही दिवसांपासून शहरात गंभीर गुन्ह्यांच्या तयारीत गुंतलेली होती. आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे :

एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे

सहा जिवंत राउंडसह आणखी एक पिस्तूल

एक धारदार मोठा चाकू

चार चाकी गाडी (एम.एच. 43 यूआर 9678)
एकूण जप्तीचा मुद्देमाल : ₹ 1,78,000


याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३३९, ३२५, ३५, तसेच शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध आधीपासूनच गंभीर गुन्हे
पोलिस तपासात उघड झाले की, ताब्यात घेतलेले आरोपी पूर्वीपासूनच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असून त्यांच्यावर चोरी, मारहाण, घरफोडी आदी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी टोळीच्या अटकेमुळे शहरातील आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या पथकाने केली.

शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून नियमितपणे अशा धडक मोहिमा राबवल्या जात असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचालीची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post