खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील रिंगरोड परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. रौनक हॉटेल चालवणारे आशिष मधुकर फिरके (वय ४८, मूळ रा. सांगवी, ता. यावल, ह. मु. संत निवृत्ती नगर) यांनी मध्यरात्री हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ती स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
आशिष फिरके हे मूळचे यावल तालुक्यातील सांगवी येथील असून, ते आपल्या कुटुंबियांसह जळगाव शहरातील संत निवृत्ती नगर येथे वास्तव्यास होते. मागील तीन वर्षांपासून ते रिंगरोड परिसरातील रामसहाय शर्मा यांच्या मालकीच्या जागेत 'रौनक हॉटेल' नावाचे हॉटेल चालवत होते. या हॉटेलसाठी त्यांनी मालकाशी तीन वर्षांचे लेखी करार करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली होती.
तथापि, करार असूनही रामसहाय शर्मा यांनी अचानक आशिष फिरके यांना जागा खाली करण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. फिरके यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी खूप विनंती करूनही शर्मा यांनी त्यांना सतत मानसिक त्रास दिला. इतकेच नव्हे, तर त्यांचा मुलगा रजनील शर्मा याच्याकडून वेळोवेळी धमक्याही मिळाल्या.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर आशिष फिरके यांनी रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व फिरके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप आले समोर
आशिष फिरके यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये थेट रामसहाय शर्मा आणि त्यांचा मुलगा रजनील यांच्यावर मानसिक त्रास आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की,
"मी आशीष मधुकर फिरके असे लिहून देतो की, माझ्या मृत्यूला जबाबदार फक्त आणि फक्त रामसहाय शर्मा आहेत. मी त्यांच्या जागेत तीन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करत आहे. त्यांनी आधी तीन वर्षांचे अॅग्रीमेंट केले होते आणि मला सांगितले होते की बेटा टेन्शन मत ले, मी अॅग्रीमेंट वाढवीन. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी मोठा खर्च केला. पण अचानक त्यांनी मला जागा खाली करण्यासाठी तगादा लावला आणि सतत त्रास दिला. त्यांच्या मुलाकडूनही धमक्या आल्या. मी माझ्या लहान मुलांचीही काळजी करण्याची विनंती केली, तरीही ते म्हणाले – ‘मुझे कुछ लेना देना नहीं’. म्हणून मी आत्महत्या करीत आहे."
सध्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पोलिसांनी आत्महत्येची नोट जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आत्महत्येमागील नेमकी कारणे, संबंधित व्यक्तींवर कारवाई होईल का, हे तपासात स्पष्ट होईल.
Tags
जळगाव