खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या ममुराबाद गावाजवळील एका आलिशान फार्महाऊसवर रविवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकत बनावट एमसीएक्स ट्रेडिंग कॉल सेंटरचा भांडाफोड केला. या कारवाईनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद रस्त्यालगत जळगावातील एका बड्या व्यक्तीच्या मालकीच्या फार्महाऊसमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, या ठिकाणी “एमसीएक्स ट्रेडिंग”च्या नावाखाली कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. या कॉल सेंटरमधून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा संशय आहे.
या माहितीच्या आधारे दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान फार्महाऊसमधून संगणक, मोबाईल फोनसह काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच तालुका पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सध्या पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याची तपासणी सुरू केली असून या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत याबाबत शोध घेतला जात आहे. प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात प्रचंड चर्चेला उधाण आले असून या कॉल सेंटरच्या माध्यमातून नेमका किती मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags
जळगाव