खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील तांबापुरा परिसरातील एक २१ वर्षीय तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. आज शनिवारी (दि. २० सप्टेंबर) सकाळी मेहरूण तलावात त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव शेख अबूजर शेख युनूस (वय २१, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) असे आहे. तो गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू करून एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंदही केली होती.
आज सकाळी सुमारास मेहरूण तलावाजवळ मासेमारीसाठी आलेल्या काही स्थानिकांना पाण्यात एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत तरुणाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले. मृतदेहाची अवस्था पाहून त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस अधिक तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेमुळे तांबापुरा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Tags
जळगाव