खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - समता नगर येथील २५ वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन केले होते. गंभीर भाजल्यामुळे आठ दिवस उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव सुनील ममराज पवार (वय २५, रा. समता नगर) असे आहे. तो आपल्या आई आणि पत्नीसोबत राहात होता आणि एका हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करत होता. काही काळापासून त्याची पत्नी माहेरी गेली होती आणि घरी परत येण्यास नकार देत होती. पत्नीने पुन्हा घरी यावे यासाठी सुनीलने प्रयत्न सुरू ठेवले होते.
६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजता, सुनील आपल्या मामीसोबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेला होता. तक्रारीबाबत चर्चा सुरू असतानाच सुनीलच्या मोबाईलवर पत्नीचा फोन आला. दोघांमध्ये फोनवर वाद झाला, आणि या क्षणी सुनीलने भावनांच्या आहारी जात टोकाचे पाऊल उचलले.
संतप्त अवस्थेत त्याने आपल्या वाहनाच्या डिकीतून पेट्रोलची बाटली काढून अंगावर ओतली आणि पोलीस ठाण्यासमोरच स्वत:ला पेटवून दिले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी योगेश माळी यांनी प्रसंगावधान राखून आपला शर्ट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ६० ते ६५ टक्के भाजल्यामुळे त्याची प्रकृती गंभीरच राहिली. अखेर १४ सप्टेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, समता नगर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी आवश्यक तपास आणि नोंद प्रक्रिया सुरू आहे.
Tags
जळगाव