ललित कोल्हे संशयितांसाठी हॉटेल बुकिंगची सोय केल्याचा आरोप, पाच दिवसांची कोठडी


खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - ममुराबाद रोडवरील एल.के. फार्म हाऊसवर जळगाव पोलिसांनी रविवारी (दि. 28) छापा टाकून ललित विजयराव कोल्हे (रा. कोल्हेनगर, जळगाव), नरेंद्र चंदू अगारिया, राकेश चंदू अगारिया, शाहबाज आलम, शाकिब आलम (चौघे रा. कोलकाता, पश्चिम बंगाल), जिशान नुरी, हाशिर रशिद यांच्यासह स्वयंपाकी अलीभाई यांना अटक केली होती.

या सर्व संशयितांना तपास अधिकारी नितीन गणापुरे यांनी सोमवारी (दि. 29) दुपारी साडेतीन वाजता न्यायाधीश एम.एम. निकम यांच्या न्यायालयात हजर केले. प्रकरणातील गुन्ह्याचे गांभीर्य व व्यापकता न्यायालयासमोर मांडताना त्यांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

तपास अधिकारी गणापुरे यांनी न्यायालयात सांगितले की, संशयितांनी व्हर्च्युअल कॉल सेंटरच्या माध्यमातून इंग्लंड, अमेरिका आणि युरोपीय देशांतील नागरिकांशी संपर्क साधून विदेशी चलनात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक केली. त्यानंतर डॉलर, क्रिप्टोकरन्सी व हवालामार्फत ही रक्कम वळविण्याचा ‘सेटअप’ फार्महाऊसमध्ये उभारण्यात आला होता.

मुंबईत बसलेले अकबर, आदिल आणि इम्रान या तिघांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २५ तरुण या बेकायदेशीर धंद्यात गुंतलेले होते. या गुन्ह्यांचा माग पश्चिम बंगाल, राजस्थान आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांपर्यंत पोहोचला आहे. अटक केलेले ललित कोल्हे हे या रॅकेटचे मास्टरमाइंड राकेशसोबत सतत संपर्कात होते. संशयितांच्या राहण्याखाण्याची सोय कोल्हे यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

सीबीआयच्या इगतपुरीतील छाप्यासारखा हा प्रकार संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच फरार संशयितांचा शोध घेणे, परदेशी नागरिकांचा डाटा कुठून मिळाला व किती लोकांची फसवणूक करण्यात आली, याचा तपास आवश्यक असल्याने कोठडीची मागणी केली.

या खटल्यामुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. संशयितांच्या बाजूने ॲड. सागर चित्रे, ॲड. मुकेश शिंपी आणि ॲड. अकिल इस्माईल यांनी काम पाहिले, तर सरकारपक्षातर्फे ॲड. वळवी यांनी बाजू मांडली.

Post a Comment

Previous Post Next Post