खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - मोती नगर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या 23 वर्षीय मयुरी ठोसरे हिने सासरकडून होत असलेल्या मानसिक आणि अश्लील छळाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे.
विवाहानंतर सुरु झाला छळ
मयुरी ठोसरे हिचा विवाह 10 मे रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सासरकडून पैशांच्या मागणीसाठी मानसिक छळ सुरु झाल्याचा गंभीर आरोप माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे. हा छळ इतका असह्य झाला की अखेर 10 सप्टेंबर रोजी मयुरीने घरात कोणी नसताना गळफास घेऊन जीवन संपवले.
विशेष म्हणजे, आत्महत्येच्या केवळ एका दिवस आधीच – 9 सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात माहेरकडून साजरा करण्यात आला होता. त्या आनंदी क्षणानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूच्या धक्क्याने ठोसरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
दीराकडून अश्लील वर्तनाचा आरोप
मयुरीच्या भावाने गंभीर आरोप करत सांगितले की, “माझ्या बहिणीचा दीर गणेश ठोसर याचा घटस्फोट झालेला असून, तो बहिणीसोबत वारंवार अश्लील वर्तन करत होता. बहिणीने याबाबत मला सांगितले होते, पण मी दुर्लक्ष केले. त्याचे वर्तन अधिकच बिघडले होते.”
या अश्लील छळामुळे मयुरीची मानसिक अवस्था खालावली होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास नकार?
या घटनेनंतर मयुरीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. मात्र माहेरकडील नातेवाईकांनी सांगितले की, त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार देण्यात आला, अशी गंभीर नाराजी कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
पती गौरव ठोसर, दीर गणेश ठोसर, सासू लता ठोसर, किशोर ठोसर आणि ननंद यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी मयुरीच्या आई-वडिलांनी केली आहे.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हुंडाबळीविरोधातील कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मयुरी ठोसरेच्या आत्महत्येने पुन्हा एकदा भयावह वास्तव समोर आणले आहे.
Tags
जळगाव