सेंट्रींग काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू; आत्महत्येमुळे परिसरात शोककळा


खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार -
शहरातील रामेश्वर कॉलनी येथील एका तरुणाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१४ सप्टेंबर) संध्याकाळी सहा ते सातच्या सुमारास समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत व्यक्तीचे नाव शंकर आधार पाटील (वय ४५) असून, ते रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते. मूळचे अमळनेर तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी असलेल्या शंकर यांचे आई-वडील सध्या नांदगाव येथेच वास्तव्यास आहेत. शंकर पाटील हे सेंट्रींगच्या कामाद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी दुपारनंतर घरात कोणीही नसताना शंकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. संध्याकाळच्या सुमारास घरच्यांनी त्यांना घरात बेहोश अवस्थेत पाहिले. तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, रुग्णालयात कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आवश्यक तपास सुरू केला असून, रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद प्रक्रिया सुरू होती.

शंकर पाटील यांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post