गणेश विसर्जनावेळी तरुण पाण्यात बेपत्ता; ममुराबाद गावावर शोककळा

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - तालुक्यातील ममुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी (वय २७) हा तरुण घरगुती गणेश विसर्जनासाठी शनिवारी सायंकाळी आपल्या कुटुंबीयांसह पाळधी-तरसोद परिसरातील गिरणा नदीवरील नव्या पुलाजवळ गेला होता. विसर्जनावेळी तो नदीत उतरला असता पाण्याची खोली जास्त असल्याने त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहात वाहून गेला. कुटुंबीयांनी आरडाओरड केली, मात्र मोठ्या प्रवाहामुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, गावकरी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु त्याचा काहीही मागमूस लागला नाही. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असून, आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी व कानळदा परिसरात नागरिक व पोलिसांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, गिरणा धरणातून तब्बल ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने नदीतील पाणीप्रवाह प्रचंड वाढला आहे. धरण ९६ टक्के क्षमतेने भरल्याने पाटबंधारे विभागाने सहा दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. चाळीसगाव येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे ममुराबाद गावात शोककळा पसरली असून, गणेशच्या निधनाने संपूर्ण गाव दुःखमग्न झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post