खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - तालुक्यातील दापोरा येथे राहत्या घरी सुरू असलेल्या बांधकामाच्या कामात गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास विजेचा जबर धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मयूर किशोर काळे (वय ३०, रा. दापोरा ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयूर हा आपल्या आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एका लहान मुलीसोबत दापोरा येथे वास्तव्याला होता. तो शेतीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. काही महिन्यांपासून त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम सुरू असून, नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तो बांधकामस्थळी गेला होता.
काम करत असताना अचानक त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे तो जागीच गंभीर जखमी झाला. शेजारी राहणाऱ्या काही तरुणांनी तत्काळ धाव घेत त्याला उचलून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मयूरचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबातील वडील व भावाने मोठा आक्रोश केला. या घटनेची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दापोरा गावात शोककळा पसरली आहे.
Tags
जळगाव