खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटजवळील उड्डाणपुलाखाली कार काढत असलेल्या तरुणावर सशस्त्रधारी टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. १४ रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
शाहुनगर परिसरातील जुबेर हमिद खाटीक (वय २८) हा तरुण कोंबडी व बकरी खरेदीविक्रीचा व्यवसाय करतो. शाहुनगरात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने त्याने आपली कार शिवशक्ती कारबाजारजवळील रेल्वे उड्डाणपुलाखाली काही दिवसांपासून पार्क केली होती. सोमवारी (दि.१४) रात्री तो कार घेण्यासाठी गेला असता, कार काढण्याच्या कारणावरून काही युवकांशी त्याचा वाद झाला. या वादाचे रुपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले.
हल्लेखोर टोळक्याने जुबेरवर बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्रांनीही हल्ला चढविला. अचानक काही तरुण घटनास्थळी धावून येत असल्याचे दिसताच हल्लेखोरांनी पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत जुबेरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अंतर्गत दुखापतीचे निदान झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला पुढील उपचारासाठी रिंगरोडवरील खासगी रुग्णालयात हलविले. गेल्या तीन दिवसांपासून तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना घटनेचा तपशील उशिरा मिळाला. अखेर जिल्हापेठ पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Tags
जळगाव