खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. अयान कॉलनी येथे राहणाऱ्या सुभान शेख भिकन या तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या सासऱ्याच्या नात्यातील तरुणाचा धारदार चाकूने खून केला असून सासरा देखील गंभीर जखमी झाला आहे.
मृत तरुणाचे नाव शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा. कंडारी ता. भुसावळ) असे आहे. जखमींची ओळख शेख जमील शेख शकूर (वय ५२, रा. धुळे) अशी झाली आहे. त्यांची मुलगी आरोपी सुभान शेख याच्याशी विवाहबद्ध आहे.
शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) दुपारी सुभान शेख याचे पत्नीशी जोरदार भांडण झाले. या वादाची माहिती तिने वडिलांना धुळ्यात दिल्यानंतर ते कंडारी येथील समद शेख याला सोबत घेऊन संध्याकाळी मुलीच्या घरी आले. रात्री सुमारास समजावणी सुरू असताना पुन्हा वाद वाढला. संतापलेल्या सुभान शेखने समद शेखवर मानेवर, छातीवर व पोटावर चाकूने सपासप वार केले. त्याचप्रमाणे सासरा जमील शेख यांच्यावर देखील वार केला.
गंभीर जखमी दोघांना तत्काळ भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी समद शेखला मृत घोषित केले, तर जमील शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असून संशयित आरोपी सुभान शेख याला ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
समद शेख हा हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुले व भाऊ असा परिवार आहे. या खुनामुळे पुन्हा एकदा भुसावळ शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.
Tags
जळगाव