खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका टूर ऑपरेटरची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रहिवासी असलेले एक हॉलिडे टूर ऑपरेटर व्यवसायिक शालिनी गौडा नामक महिलेच्या संपर्कात आले. तिने त्यांना ‘ऑप्टिनेक्स मार्केट्स’ या नावाच्या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीची माहिती देत, येथे गुंतवणूक केल्यास कमी वेळेत मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवले.
सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवर ४ हजार ५६० रुपयांचा नफा दाखवण्यात आला. त्यामुळे विश्वास बसल्याने टूर ऑपरेटरने ७ ते ३० ऑगस्टदरम्यान टप्प्याटप्याने तब्बल ४५ लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात गुंतवले. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळाली नाही.
या प्रकारानंतर टूर ऑपरेटरने ३ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ४२० (फसवणूक) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सायबर पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
Tags
जळगाव