खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून विवाहित महिलेला फसविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे याने पश्चिम बंगालमधील एका विवाहित महिलेसोबत २०२१ ते २०२५ या काळात हॉटेलमध्ये अत्याचार केला. तसेच त्याच्या पत्नी व आईच्या संमतीने वकिलांकडून चुकीचे संमतीपत्र बनवून घेतले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगालमध्ये हैदराबाद येथे राहणाऱ्या महिलेची २०१७ मध्ये फेसबुकवर नितीन सपकाळे याच्यासोबत ओळख झाली. दोघांत नियमित बोलणे सुरू झाले आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्या काळात पतीसोबत पटत नसल्याने २०१८ मध्ये पीडित महिलेचा घटस्फोट झाला. त्यानंतर सपकाळे याने तिला जळगावला बोलावून संसार करण्याचे आश्वासन दिले.
२०२१ मध्ये महिला जळगावला आल्यावर सपकाळे याने रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये रूम बुक करून लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेच्या लक्षात आले की सपकाळे विवाहित असून त्याला पाच वर्षांची मुलगीही आहे. यावर महिलेने विचारणा केली असता, सपकाळे याने पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. त्याने खोटे कागदपत्रेही दाखवली.
महिलेने सत्य समजून घेतल्यानंतर सपकाळे याने तिच्याशी लग्नास नकार देत धमकी दिली. १३ मे २०२५ रोजी महिला पुन्हा जळगावला आली असता सपकाळे आणि त्याची पत्नी तिला भेटले. त्यावेळी पत्नीने पैसे देतो, केस करू नकोस, काही दिवसांत लग्न लावून देतो असे सांगितले. दोन दिवसांनी सपकाळे याने तिला कोर्टाजवळ नेऊन वकिलांकडून संमतीपत्रावर सही करून घेतली आणि भुसावळ रोडवरील मंदिरात लग्न लावून दिल्याचा खोटा आभास निर्माण केला.
यानंतरही सपकाळे याने तिच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने महिला कोलकात्याला परत गेली. अखेर फसवणूक व अत्याचाराचा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे, त्याची पत्नी व आईविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Tags
जळगाव