एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; समीर काकर येरवडा कारागृहातून अटक


खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत व कुख्यात गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. बिस्मिल्ला चौक, तांबापुरा, जळगाव) याला अखेर महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा (MPDA – Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत अटक करण्यात आली असून त्याला पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

समीर काकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत, घरफोडी यांसह तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तांबापुरा, मेहरुण व जळगाव परिसरात त्याची दहशत पसरली होती. साध्या नागरिकांना विनाकारण मारहाण, शिवीगाळ तसेच दहशत निर्माण करण्याची गुन्हेगारी कृत्ये तो सातत्याने करत होता. यापूर्वी एकदा त्याला वर्षभरासाठी जिल्हा हद्दपार करण्यात आले होते; मात्र हद्दपारीतून परतल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबली नव्हती.

त्याच्या सततच्या कारवायांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवण्यात आला. अधीक्षकांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले.

आदेशानंतर समीर काकर फरार झाला होता. मात्र २४ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तो पुण्यात लपल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शोध पथक पुण्यात रवाना झाले. २५ सप्टेंबर रोजी पुण्यात शिताफीने अटक करून त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो. काँ. विशाल कोळी, गणेश ठाकरे आणि योगेश घुगे यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post