खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेत्या आणि नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाला त्यांच्या या निर्णयाचा तगडा झटका बसण्याची शक्यता आहे.
डॉ. हिना गावित या अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही मागणी केली होती, मात्र मतदारसंघ शिंदे गटाला दिल्यामुळे त्यांची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे पक्षात राहून अपक्ष उमेदवारी करणे पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते, या कारणामुळे गावित यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
भाजप व महायुतीसाठी हा धक्का असताना, विरोधकांसाठी मात्र ही घटना एक अनुकूल संधी म्हणून पाहिली जात आहे. निवडणूक अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अनेक मतदारसंघांत उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी काही ठिकाणी बंडखोरीचे सूर अजूनही कायम आहेत. महायुती व महाविकास आघाडीसाठी बंडखोर व अपक्ष उमेदवारांची समस्या मोठी ठरत असून, त्यांचं मनधरण करण्याचे प्रयत्न काही ठिकाणी फसले आहेत.
डॉ. गावित यांच्या राजीनाम्याने भाजपा आघाडीतील नाराजीचे वारे आणखी वाढले असून, निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील एकजूट प्रश्नचिन्हात आली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
-----------------------------------