खबर महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी | नागपूर: विधानसभा निवडणुकीस काही तास शिल्लक असताना काटोलमध्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
हल्ल्याची घटना:
अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी सोमवारी नरखेड येथे आयोजित सभेनंतर काटोलकडे परतत होते. जलालखेडा मार्गावरील बेलफाटा भागात गतीरोधकाजवळ त्यांची गाडी थांबली असता, तोंडाला कपडे बांधलेल्या तीन-चार व्यक्तींनी अचानक गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ला होताच देशमुख यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली, मात्र हल्लेखोर घटनास्थळावरून शेतामध्ये पसार झाले.
पोलिसांची कारवाई सुरू:
घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून त्यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध:
या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले आहेत. “राज्यात लोकशाही धोक्यात आली आहे. हल्लेखोरांना तातडीने अटक झाली नाही, तर आम्ही आंदोलन छेडू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजकीय तणाव वाढला:
या घटनेमुळे काटोल मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हल्ल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांवर आरोप केला असून, याला भाजपकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
संपूर्ण घटनेमुळे निवडणूक प्रचारात नव्या वादाला तोंड फुटले असून सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
क्राईम