खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव शहर मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनिल महाजन यांनी आपल्या प्रचार मोहिमेची धडक सुरुवात केली आहे. आज (दि.५) रोजी सकाळी प्रभाग क्रमांक ५, भाग २ मधील विविध भागांतून त्यांनी प्रचार चालवला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयश्रीताईंनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला.
जळगावच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगत जयश्रीताईंनी दीक्षित वाडी, पांडे चौक, पारिख पार्क, विसनजी नगर, जयकिसन वाडी, आणि नवी पेठ या भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले व मतदारांना महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
जयश्रीताईंच्या प्रचार दौऱ्यात शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. तरुणांनी फटाके फोडून जल्लोष केला तर महिलांनी औक्षण करून जयश्रीताईंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ‘जळगावला हवा बदल आणि न्याय, जयश्रीताईंशिवाय नाही पर्याय’ आणि ‘जयश्रीताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी रस्ते दणाणून गेले. जयश्रीताईंच्या नेतृत्त्वाने जळगावकरांच्या मनात विकासाची आशा निर्माण झाली आहे.
या प्रचारदौऱ्यात जयश्रीताई महाजन यांच्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.