खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - इच्छादेवी चौकी परिसरात वाहतूक शाखेने मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणाऱ्या चालकावर कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस शिपाई वैशाली पाटील यांना एका ट्रक चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानुसार एम.एच.15-इझेड-6253 क्रमांकाचा ट्रक थांबवण्यात आला.
तपासादरम्यान चालक विशाल वाघ (वय 25) याची ब्रेथ अनालायझर चाचणी पोलिस नाईक धनराज बडगुजर (ब.नं. 733) आणि पोलीस अमलदार दीपक पाटील (ब.नं. 98) यांनी केली. त्यात चालकाने मद्यपान केले असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ त्यास ताब्यात घेऊन ट्रकसह वाहतूक शाखा कार्यालय, जळगाव येथे आणण्यात आले.
सदर ट्रकमध्ये "टॅंगो पंच" नावाची दारू भरलेली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकची तपासणी केली असता दारूसंदर्भातील सर्व कागदपत्रे कायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ट्रकमधील दारूसंदर्भात कोणतीही बेकायदेशीर बाब आढळून आली नाही.
मात्र, चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवले असल्यामुळे मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक पवन दिसले यांच्या आदेशाने चालकाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्याकडून दंड वसूल करून समज देत सोडून दिले.
वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. यामुळे केवळ स्वतःचा नव्हे तर इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
Tags
जळगाव