खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - चाळीसगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत हिरापूर रोडवर लाखोंच्या प्रतिबंधित गुटख्याची तस्करी उघडकीस आणली. विशेष सापळा रचत एक बोलेरो गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंदाजे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाईचे सूत्रधार पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, पीएसआय संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे व समाधान पाटील यांच्या पथकाने ही कारवाई अत्यंत नियोजनबद्धपणे पार पाडली. संशयास्पद स्थितीत आढळलेल्या बोलेरो गाडीची कसून झडती घेतली असता, प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या प्रकरणात वाहनचालक सलीम मुनीर खान (रा. पाचोरा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. जप्त केलेल्या गुटख्याचे अंतिम मूल्यांकन अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पथकाच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार जप्त गुटख्याची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
या कारवाईमुळे चाळीसगाव परिसरातील गुटखा माफियांना मोठा धक्का बसला आहे. शहरात यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्या तरी, पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त होणे हे या तस्करीच्या पार्श्वभूमीचा सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे करत आहे.
Tags
जळगाव