खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून, प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत असली तरी वाळू चोरी रोखली जात नाही. मात्र, आता धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी गिरणा नदी पात्रात उतरून थेट वाळू चोरांवर कारवाईचा प्रयत्न केल्याचा थरारक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २४ जुलै रोजी तहसीलदार सूर्यवंशी हे जळगावहून धरणगावकडे जात असताना बांभोरी पुलाजवळ गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन व ट्रॅक्टरने वाहतूक सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सिनेस्टाईल थेट नदी पात्रात उतरत पोहत पोहत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तहसीलदार असल्याचे लक्षात येताच वाळू चोरांनी वाहनांसह पलायन केले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
धाडसी प्रयत्नांमुळे नागरिकांकडून कौतुक
तहसीलदार सूर्यवंशी यांनी भरदिवसा नदीत उतरून जीव धोक्यात घालून केलेला हा प्रयत्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. जरी चोरटे त्या वेळी पळून जाण्यात यशस्वी ठरले असले तरी तहसीलदारांच्या धाडसी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची वाढती दादागिरी आणि प्रशासनाची मर्यादा यावर लक्ष वेधले गेले आहे.
Tags
जळगाव