🧑‍🦽 दिव्यांगांसाठी काम करणारी अधिकारीच अडकली लाचखोरीत!

५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडली – ACBची कारवाईने खळबळ

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कालच २ हजार रुपयांची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागात कार्यरत असलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती माधुरी सुनिल भागवत (वय ३८) यांना आज ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली आहे.

ही घटना गुरुवारी (२४ जुलै २०२५) जळगाव शहरात घडली. या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे भौतिक उपचार तज्ज्ञ तसेच प्रभारी अधीक्षक (वर्ग २) पदावर कार्यरत आहेत. दिनांक १४ जुलै २०२५ रोजी त्यांनी जून महिन्याच्या पगार बिलासंदर्भात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात भेट दिली होती. त्या वेळी श्रीमती भागवत यांनी १२,००० रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाच न देता २२ जुलै रोजी ACB जळगाव कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर लाच मागणीची पुष्टी झाल्यानंतर ACB च्या पथकाने २४ जुलै रोजी सापळा रचत, तडजोडीनुसार पहिल्या हप्त्यातील ५,००० रुपये स्वीकारताना श्रीमती भागवत यांना अटक केली. उर्वरित ७,००० रुपये इतर बिले मंजूर झाल्यावर घेण्याची तयारी आरोपीने दर्शवली होती.

कारवाई करणारे अधिकारी आणि पथक
या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा आणि तपास अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक हेमंत नागरे कार्यरत होते. त्यांच्या सहाय्याला सुरेश पाटील (चालक), पो.हे.का. श्रीमती शैला धनगर, पो.का. प्रणेश ठाकूर, पो.का. सचिन चाटे हे कर्मचारी उपस्थित होते.

सध्या या प्रकरणात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडून सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post