खळबळजनक I जळगावात अज्ञात दुचाकीस्वाराने केला गोळीबार; हल्लेखोर फरार

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्यावर गुरुवारी रात्री घडलेली गोळीबाराची घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. हॉटेल रायबा येथे आलेल्या दुचाकीस्वार दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, रा. पुनगाव, ता. यावल) यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हॉटेल रायबा हे प्रमोद बाविस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाड्याने घेतले होते. गुरुवारी रात्री सुमारास साडेआठच्या दरम्यान दोन अज्ञात इसम दुचाकीवरून हॉटेल परिसरात आले आणि त्यांनी अचानक प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या छातीत तर दुसरी खांद्यावर लागली. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून फरार झाले.

जखमी अवस्थेत बाविस्कर यांना तत्काळ जळगाव येथील अरुश्री हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टर परिक्षित बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत गोळी अडकलेली असून तातडीने शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना एक रिकामे काडतूस सापडले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, जुना वाद किंवा व्यक्तिगत वैरातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले जात आहेत. यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मनुदेवी फाटा हा यावल तालुक्यातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post